

Municipal elections, distribution of symbols to independents
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहर महापालिका निवडणुकीसाठी शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. त्यात चष्मा, शिट्टी, बादली, पुस्तक, फुटबॉल, लॅपटॉप, ऑटो रिक्षासह विविध चिन्हांचा समावेश आहे.
जालना शहर महापालिका निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रात्री उशीरापर्यंत रिंगणात असलेल्या उमेदवारांचा घोळ सुरु होता. महापालीकेच्यावतीने दोन वेळेस उमेदवारांची यादी देण्यात आल्यानंतर अखेर रात्री उशीरा रिगणात असलेल्या उमेदवारांची संख्या निश्चीत झाली.
त्यात ४५२ उमेदवार निवडणुक रिंगणात उरल्याचे समोर आले. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांतही गोंधळ उडाला होता. दरम्यान शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. या चिन्ह वाटपात अॅटोरिक्षा, लॅपटॉप, बॅट, गॅस सिलेंडर, पतंग, नारळ, मेनबत्ती, शिलाई मशिन, रोबोट, एअर कंडीशन, ट्रॅक्टर, पुस्तक, फुटबॉल, दुरदर्शन संच, बादली, चष्मा, शिट्टी, ट्रकसह इतर चिन्हांचा समावेश आहे.
शनिवारी चिन्ह वाटपानंतर अपक्ष उमेदवारांसह विविध पक्षांचे उमेदवार प्रचारास लागल्याचे पहावयास मिळाले. एमआयएम पक्षाच्या नेत्यांनी सभा घेण्यास सुरुवात केली असुन भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा होणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्या सभा होण्याची शक्यता आहे.
उमेदवारांनी प्रभागातील मतदारांशी सपंर्क करुन आपल्यालाच मतदान देण्यासाठी व्युव्ह रचनेस प्रारंभकेला आहे. महापालीकेचे मतदान १५ जानेवारी रोजी आहे. मतदानासाठी अवघे दहा ते बारा दिवस शिल्लक असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांची प्रचार करतांना आगामी काही दिवसात दमछाक होणार आहे. उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयासह समर्थक प्रचाराची धुरा सांभाळतांना दिसत आहेत.
उमेदवारांची संख्या अधिक
जालना महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने कोण विजयी होणार या बाबत उत्सुकता आहे. निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचे जय-पराजय हा अपक्ष व इतर उमेदवार कोणाची मते घेतात या मतदानावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.