

Municipal election: 804 application forms sold on the first day
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मंगळवार, २३ रोजीपासून नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण १५ विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची आधीच नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पाचही कार्यालयांमध्ये आज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळाली. पहिल्याच दिवशी एकूण ८०४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. मात्र, अद्याप एकही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेला नाही.
निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून मतदार याद्या आणि बेबाकी (नो ड्यूज) प्रमाणपत्र वितरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यापूर्वीच विविध समित्यांचे गठन केले असून, यामध्ये आदर्श आचारसंहिता, आपापल्या कायदा व सुव्यवस्था आणि ईव्हीएम व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या तातडीने पार पाडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आजपर्यंत जालना महापालिकेमार्फत २१६ अंतिम मतदार याद्यांची विक्री करण्यात आली आहे.