

Municipal corporation in action mode for tax recovery
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आशिमा मित्तल यांनी शहरातील नागरिक, रहिवासी, व्यावसायिक मालमत्ताधारक व भोगवटादार यांनी थकीत मालमत्ता करासह इतर कर व पाणीपट्टी तत्काळ भरावी. शहराच्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे प्रशासनाने अवाहन केले आहे.
महानगरपालिका हद्दीतील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर नागरी सुविधांच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असते. मालमत्ता कर व पाणीपट्टी हे मनपाच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. हे उत्पन्न वाढल्यास विकासकामांना गती देणे शक्य होईल. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी मालमत्ताधारकांना थकीत असलेला आणि चालू वर्षाचा कर तत्काळ मनपाकडे भरून शहर विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
जालना शहरातील विकास कामांवर मालमत्ता कर व पाणीपट्टी बिलाची वसुली होत नसल्याने मोठा परिणाम झाला आहे. महापालिकेला जायकवाडी जलाशयातून शहरास पाणीपुरवठा करताना मोठा खर्च करावा लागत आहे. कर वसुली नसल्याने विविध विकास कामे प्रलंबित राहात आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी कर भरण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, जे मालमत्ता धारक कर भरणार नाहीत, त्यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. यात मालमत्ता जप्ती किंवा इतर दंडात्मक कारवाईचा समावेश असेल.