

School Girl Death incident Jalna
जालना : शहरातील एका विद्यालयातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या तेरा वर्षीय मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपविले. ही खळबळजनक घटना आज (दि. २१) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नवीन जालना भागातील एका विद्यालयात सकाळी आठच्या सुमारास प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जात असताना मुलीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपविले. मुलीचा मृतदेह जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून याप्रकरणी पालकांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
कुटुंबीयांनी शाळेतील काही शिक्षकांवर सतत मानसिक छळ आणि त्रास देत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कुटुंबाचे म्हणणे आहे की, “आरोहीवर दबाव टाकला जात होता. याबाबत शाळा प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.” त्यामुळे मुलगी नैराश्यात गेल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची प्राथमिक नोंद घेत तपास वेगाने सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात असून, संबंधित शिक्षक व शाळा प्रशासनाचीही चौकशी सुरू आहे. आवश्यक असल्यास पुढील गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात शोककळा आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.