

Municipal Corporation: 'Bhimpark' issue set to dominate General Body Meeting
जालना, पुढारी वृत्तसेवाः गत महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील मोतीतलाव परिसरात उभारण्यात येत असलेल्या भीमपार्क विपश्यना केंद्राचा मुद्दा केंद्रस्थानी ठरला होता. या मुद्द्यावरून महापौरांना सभा तहकूब करावी लागली होती. सभागृहात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. आता गुरुवार, दि. १० रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील या भीमपार्कच्या मुद्यासह पथदिवे, सांडपाणी, मोकाट जनावरं, पालिकेची मालमत्ता आदी विषयांवर चर्चा रंगणार आहे.
दरम्यान, शहरातील मोतीतलाव परिसरात भीमपार्क विपश्यना केंद्राचा विषय विषय पत्रिकेवर न घेतल्यामुळे विरोधी पक्षगट आक्रमक झाला होता. शहरातील बौध्द समाजासह इतर सर्व समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शिवाय, येथे सर्वांना विपश्यनेचे धडे मिळतील, अशी मागणी लावून धरत विरोधकांनी काही वेळ गोंधळ घातला होता. गत सर्वसाधारण सभेत महापौर वंदना मगरे यांनी येणाऱ्या सर्वसाधारण सभेत भीमपार्क विपश्यना केंद्राचा मुद्दा मी स्वतः विषय पत्रिकेवर घेईल, असे आश्वासन दिले होते. आता उद्या गुरूवारी होणाऱ्या या सर्वसाधारण सभेत या मुद्यावर काय चर्चा होते हे कळणार आहे.
शिवाय, शहरातील पीआर कार्डचा मुद्दा देखील सभागृहात उचलल्या जावू शकतो. त्यावेळी आयुक्त अंजली शर्मा यांनी सध्या एजन्सी मार्फत सर्वे करण्यात येत असल्याचे सांगून पीआरकार्ड देण्याचा अधिकार महसूल विभागाचा आहे. या संदर्भातील संचिका महापालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत, असे सांगण्यात आले होते.
आता या विषयावर काय कारवाई झाली, असा सवाल उपस्थित केला जावू शकतो शिवाय, घंटा गाडीच्या जीपीएसचा प्रश्न, वॉर रुम तयार झाली की नाही, पथदिवे, स्मारकांचे सुशोभिकरण, भूमीगत सांडपाणी, मलनिस्सारण आणि सांडपाणी, शहरातील वृक्षतोड आदींसह इतर मुद्यावर देखील चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
भूमिगत सांडपाणी व्यवस्थेचा मुद्दा रडावर
शहरात ४० डीपी रोड बनवण्यात आले. त्यापैकी ३५ रस्त्यावर अंडर ग्राउंड ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात आली नाही. त्यामुळे ते अगोदर काम हाती घ्यावे. भूमीगत ड्रेनेज व्यवस्था उभारली गेली नाही तर ते रस्ते देखील खराब होतील, अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली होती. यामुळे हा मुद्दादेखील पुन्हा ऐरणीवर येणार आहे. अजून सांडपाणी आणि मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यावर देखील चर्चा चांगलीच रंगणार आहे.