

Pardhad Police Illegal Alcohol Seizure
पारध : सुंदरवाडी शिवारातील शेतात विहिरीजवळ बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पारध पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दारू निर्मितीसाठी ठेवलेले ५०० लिटर मोहाचे मिश्रण आणि ३० लिटर तयार गावठी दारू असा एकूण ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विठ्ठल कुंडलीक गवळी (वय ५६, रा. वालसावंगी, ता. भोकरदन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुंदरवाडी शिवारातील विठ्ठल गवळी यांच्या शेतातील विहिरीजवळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी ठेवलेले ५०० लिटर मोहाचे आंबट व उग्र वासाचे मिश्रण आढळून आले. त्याची अंदाजे किंमत ५० हजार रुपये आहे. तसेच ३० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू, अंदाजे सहा हजार रुपये किमतीची, पोलिसांच्या हाती लागली.
दारू निर्मिती अथवा साठवणुकीसाठी कोणताही परवाना नसतानाही संबंधित व्यक्तीने मोहाचे मिश्रण आणि तयार गावठी दारू बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील सुखदेव जाधव यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५ (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोहेकॉ. जि. गावंडे यांनी केली असून, पुढील तपास पोहेकॉ. पी. एन. सिनकर करीत आहेत.
सुंदरवाडी शिवारातील या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. गावठी दारूची निर्मिती आणि विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची गरज असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.