

Marathas want reservation within fifty percent
वडीगोद्री पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतच आरक्षण हवे आहे, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. मंत्री छगन भुजबळ यांनी दहा टक्के आरक्षण स्वीकारावे या आवाहनावर त्यांनी पलटवार करीत प्रगत ओबीसींनी आरक्षणावरील दावा सोडावा, असे ते म्हणाले.
अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. ५० टक्क्यांच्या वरचे १० टक्के आरक्षण आम्हाला नको. आम्ही मागास सिद्ध झालेलो आहोत. मग आमचे एसईबीसी १० टक्के आरक्षण ५० टक्क्याच्या आत घ्या. एसईबीसी १० टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते ५० टक्क्यांच्या आत पाहिजे, असे जरांगे यांनी नमूद केले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्व जातींना समान लेखले पाहिजे. कारण ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यांनी एका जातीला ओढले असा संदेश जायला नको. त्यांचा आम्ही आदर करतो, असे त्यांनी सांगितले.
ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेल्या काही जातींना ३२ टक्के आर-क्षणाचा फायदा झाला. आतापर्यंत आमचे आरक्षण खाल्ले आहे, ते आम्ही परत घेत आहोत. राजकारणापायी भुजबळ हे ओबीसींना उलटे समजाऊन सांगत आहे. त्यांचे काही ऐकू नका. हा मेटाकुटीला आला आहे, डोळे लाल दिसू नये म्हणून याने आज काळा चष्मा घातला आहे. याला आता यापुढे विसरभोळा मंत्री नाव द्यावे अशी मल्लीनाथी त्यांनी केली.
मुंबईत मराठा आंदोलनाच्या वेळी एक संस्कृती दिसली. भुजबळांना नेपाळ, इंग्लड अशा ठिकाणी सोडायला पाहिजे. महाज्योतीला हजारो कोटी दिले तेव्हा आम्ही काही म्हणालो आहे का? सारथीला आत्ता निधी यायला लागला तर याच पोट दुखत आहे. याने १९९४ ला वेडा वाकडा जीआर काढायला लावला. मराठ्यांनी मर्दानगी दाखवून आता पर्यत मिळविले आहे, असे ते म्हणाले.
लातूरमध्ये एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केली असून त्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र कुणीही आत्महत्या करु नये. कारण राजकारणी येतात भेटून जातात, मात्र कुटुंब उघड्यावर पडते. राजकारणी नेते त्याचे राजकारण करु लागतात, अशी टीका जरांगे यांनी भुजबळांचे नाव न घेता केली.