

Confusion in distribution of utensil sets, beneficiaries in a quandary
जालना, पुढारी वृत्तसेवा : नोंदीत बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मोफत भांडी संच वाटप करण्यात येतो. सध्या शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या गोदामात या संचाचे वाटप करण्यात येत आहे. भांडी घेण्यासाठी येथे लाभार्थ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली असून, भांडी वाटप होताना मोठा गदारोळ निर्माण होत आहे. याकडे सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केल्या जात आहे.
दरम्यान, जालना औद्योगिक वसाहत भागात भांडी ठेवण्यासाठी एका कंपनीला कंत्राट दिले आहे. येथे एका गोदामात भांडी संच ठेवण्यात आला आहे. तेथे नोंदीत बांधकाम कामगाराची ऑनलाईन अपॉइंमेंट घेऊन त्यांना भांड्यांचा संच वितरित करण्यात येतो. दररोज सुमारे अडीचे ते तीनशे लाभार्थी येथे बोलवण्यात येतात.
यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. प्रारंभी या कमगाराकडून सुरुवातीला १०० रुपये नोंदणी घेतली जाते. नंतर भांडे देताना ५०० रुपये घेतले जातात. असे येथील काही बांधकाम कामगार लाभार्थ्यांनी सांगितले. असे असले तरी या बाबीकडे सरकारी कामगार अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरापे सिटू अंतर्गत असलेल्या लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीने निवेदन देऊन भांडी वाटपात होत असलेली अनागोंदी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाच्या ध्यानात आणून दिली. बांधकाम कामगारांनी अनेक महिन्यांपासून नोंदणी व अद्यापपर्यंत निकाली काढले गेले नाहीत. विविध लाभाच्या अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची त्रुटी नसताना त्रुट्या काढून अर्ज बाद केल्या जातात. याकडे लक्ष घालून संबंधितांना सूचना कराव्यात.
ऑनलाइन पद्धतीने अपॉइंटमेंट घेऊन भांडी वाटप चालू झाले आहेत, मात्र भोकरदन व जालना येथील भांडी वाटपाच्या गोडाऊनवर भांडी वाटप करणारे जे काही कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी कामगारांकडून पैशाची मागणी करून त्यांना भांडी देत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर ज्येष्ठ कामगार नेते अण्णा सावंत, मधुकर मोकळे, अॅड. अनिल गिसाळ, बाबासाहेब पाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
या आहेत मागण्या...
नोंदणी व नूतनीकरणाचे पेंडिंग अर्ज त्वरित निकाली काढा. ?
विविध लाभाचे अर्ज दाखल केलेले असतानादेखील जाणीवपूर्वक त्रुट्या टाकल्या जात आहेत, त्याची चौकशी करून त्या अर्जाना त्वरित मंजुरी द्यावी.
भांडी वाटपात जो काही गदारोळ होत आहेत त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.
भांडी वाटपाचे सेंटर निवडताना देखील जालना येथील सेंटर निवडले की भोकरदन सेंटर मिळते ही देखील त्रुटी दुरुस्त करावी.
नोंदीत बांधकाम कामगारांना दिवाळीनिमित्त पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.