

Manoj Jarange on Chhagan Bhujbal
वडीगोद्री: मराठा असो वा ओबीसी, कुणीही आत्महत्या करू नये. लातूरमधील एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. पण आत्महत्या करून काहीही मिळत नाही. राजकारणी भेटतात आणि निघून जातात, मात्र कुटुंब उघड्यावर पडते. त्यातून राजकारण सुरू होते, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांचे नाव न घेता केली.
जरांगे म्हणाले की, ५० टक्क्यांवरचे स्वतंत्र १० टक्के आरक्षण आम्हाला नको आहे. आम्ही मागास सिद्ध झालेलो असल्याने एसईबीसीचे १० टक्के आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत द्यावे. “एसईबीसी आरक्षण आम्हाला हवे आहे, पण ते ५० टक्क्यांच्या आत असले पाहिजे. हा प्रश्न सर्व मराठा नेत्यांनी भुजबळांसमोर मांडायला हवा,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांविषयीही भाष्य केले. “ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व जातींना समान दृष्टीकोनातून पाहावे. एखाद्या जातीला विरोध केल्याचा संदेश जाऊ नये. आम्ही त्यांचा आदर करतो,” असे जरांगे यांनी सांगितले.
जरांगे यांनी भुजबळांवर टीका करताना प्रश्न उपस्थित केला की, “तुमच्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केले आहे का? इतके दिवस तुम्हीच आरक्षणाचा लाभ घेतला. आता ते सोडणार आहात का? शिक्षण आणि भरत्या यामध्येही अन्याय झाला आहे. ओबीसी समाजाला चुकीची माहिती देऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
तसेच त्यांनी भुजबळांच्या वक्तव्यांवरून त्यांना “विसरभोळा मंत्री” अशी उपाधी देत उपहासात्मक टीकाही केली. “महाज्योतीला हजारो कोटी रुपये देण्यात आले, तेव्हा आम्ही काही आक्षेप घेतला नाही. आता सारथीला निधी मिळू लागल्यानेच त्रास होत आहे. १९९४ मध्ये चुकीचा जीआर काढण्यामागेही त्यांचा हात होता. पण मराठा समाजाने नेहमीच लढून हक्क मिळवले आहेत,” असेही जरांगे म्हणाले.