Manoj Jarange Patil: बंडू जाधवांवर जरांगे पाटील संतापले! ‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक केलीस’; 12 तारखेला काय होणार?

Manoj Jarange Patil Bandu Jadhav: परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करण्यास खासदार बंडू जाधव यांनी नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
Manoj Jarange Patil Bandu Jadhav
Manoj Jarange Patil Bandu JadhavPudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Bandu Jadhav: परभणीतील नियोजित शेतकरी मेळावा रद्द करण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांच्यातील वाद वाढला आहे. कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करूनही बंडू जाधव यांनी मेळावा होणारच, अशी भूमिका घेतल्याने जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

“बंडू जाधव यांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. आता त्यांच्या राजकारणाला अवकळा लागली समज,” असे वक्तव्य जरांगे यांनी केले. अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्यासह एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावरही निशाणा साधला.

‘मराठा समाजामुळे राजकारण उभं राहिलं’

बंडू जाधव यांचे राजकीय अस्तित्व मराठा समाजाने उभे केले असल्याचा दावा जरांगे यांनी केला. शेतकरी मेळावा आयोजित करण्यापेक्षा मराठा समाजाच्या भावना समजून घेणे आणि समाजासोबत राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.

कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केल्यानंतरही ती मान्य न केल्याने जाधव यांनी चुकीचा निर्णय घेतल्याचे जरांगे म्हणाले. त्यांच्या या निर्णयाचा राजकीय परिणाम भविष्यात दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिंदे आणि शिरसाटांवरही जरांगेंचा निशाणा

बंडू जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांचे म्हणणे ऐकून हा निर्णय घेतल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या मते, या निर्णयामुळे बंडू जाधव यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्यावरील राजकीय दबावही वाढू शकतो. जरांगे यांनी जाधव यांच्या समर्थकांबाबतही आक्रमक भाष्य केले. मोठ्या संख्येने समर्थक किंवा कार्यकर्ते असले तरी केवळ त्या जोरावर राजकारण करता येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

‘शेतकऱ्यांच्या आडून मराठ्यांच्या विरोधात भूमिका’

शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली जात असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. बंडू जाधव आणि संजय शिरसाट यांच्यात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “तुमच्यामुळे राज्यातील वातावरण खराब होईल,” असा इशारा देत जरांगे यांनी आगामी आंदोलनाचीही माहिती दिली.

‘12 तारखेला पुढची तारीख जाहीर करू’

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची पुढील दिशा 12 तारखेला जाहीर केली जाईल, असे जरांगे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे सांगत, त्याला मुंबईत उत्तर देणार असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे 12 तारखेला जरांगे पाटील कोणती घोषणा करतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil Bandu Jadhav
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदेंचा परभणीतील कार्यक्रम रद्द करा! जरांगेंचा बंडू जाधवांना थेट फोन; ‘अन्यथा मी....’

‘कार्यक्रम घेऊ नका’, जरांगेंची आधीच भूमिका

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीत होणाऱ्या कार्यक्रमावरून हा वाद सुरू झाला. जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, जाधव यांनी कार्यक्रम रद्द करण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमधील संघर्ष समोर आला.

जरांगे यांनी यापूर्वीही कार्यक्रमामुळे वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली होती. आता त्यांनी थेट बंडू जाधव यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Manoj Jarange Patil Bandu Jadhav
Supreme Court: कार-बाईक मालकांसाठी महत्त्वाची बातमी; E20 Petrol वर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, कोणत्या गोष्टी बदलणार?

‘एकनाथ शिंदेंना इथेच थांबावं लागेल’, जरांगेंचा इशारा

कार्यक्रमामुळे परिस्थिती अधिक चिघळल्यास त्याचा परिणाम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर होऊ शकतो, असा इशाराही जरांगे यांनी दिला. “तुमच्यामुळे एकनाथ शिंदेंना इकडेच राहण्याची वेळ येईल,” असे ते म्हणाले.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर परभणीतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. बंडू जाधव आणि शिवसेनेकडून या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले जाते, तसेच 12 तारखेला जरांगे कोणती पुढील भूमिका जाहीर करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news