Jalna Power Supply Disruption : सौर ऊर्जा प्रकल्पाचा वीजपुरवठा पाच दिवसांपासून ठप्प

तळणी, पूर्णा, देवठाणा सर्किटमधील अनेक गावांना वीजटंचाईचा फटका
Jalna Power Supply Disruption
Jalna Power Supply Disruptionpudhari photo
Published on: 
Updated on: 

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील लुमिना क्लीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या ५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पातील इन्सुलेशन किट जळाल्याने गेल्या पाच दिवसांपासून ३३ केव्ही केंद्राला होणारा वीजपुरवठा बंद झाला आहे. परिणामी तळणी, पूर्णा आणि देवठाणा सर्किटअंतर्गत येणाऱ्या अनेक गावांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

यंदा परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरिपात आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या भरवशावर गहू, हरभरा तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पाच दिवसांपासून वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. विशेषतः देवठाणा सर्किटमधील शेतकऱ्यांना वीज मिळण्याची तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे हाताशी आलेला रब्बी हंगामही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Jalna Power Supply Disruption
Swimming Pool Tragedy : बंगळूरच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये विजेचा धक्का लागून दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

तळणी येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून दिवसा ३३ केव्ही केंद्राला वीजपुरवठा केला जातो. या पुरवठ्यावर परिसरातील शेतीच्या वीज व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात भार आहे. मात्र, प्रकल्पातील तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीला लागणारा विलंब यामुळे या व्यवस्थेच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रकल्पस्थळी सक्षम अधिकारी आणि तज्ज्ञ तंत्रज्ञांची उपलब्धता आहे का, तसेच आपत्कालीन दुरुस्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारा सौर प्रकल्पच वीजपुरवठ्यातील अडथळ्यामुळे अडचणीचे कारण ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Jalna Power Supply Disruption
Jalna Diwali Market : दिवाळीच्या स्वागतासाठी जालना बाजारपेठ सजली

वीजपुरवठ्याच्या समस्येचा परिणाम शेतीबरोबरच बँकिंग आणि व्यापारी क्षेत्रावरही होत आहे. सध्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याने बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र, वीजपुरवठा आणि नेटवर्कच्या अडचणींमुळे बँकेतील कामकाजावर परिणाम होत असून शेतकऱ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय वाढली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

दुरुस्तीची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापनाची

"सौर ऊर्जा प्रकल्पाची देखभाल व दुरुस्ती याच्याशी महावितरणचा थेट संबंध नाही. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापनाने स्वतःची स्वतंत्र दुरुस्ती यंत्रणा ठेवणे गरजेचे आहे. पाच दिवसांपासून पुरवठा बंद असल्याने ३३ केव्ही केंद्राला सौर ऊर्जा मिळत नाही," असे तळणीचे लाईनमन एस. एन. पौळ यांनी सांगितले.

ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा अधिक भार

तळणी येथील ३३ केव्ही केंद्रावरील ट्रान्सफॉर्मरवर सध्या क्षमतेपेक्षा अधिक भार येत आहे. यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी आणि तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नाइलाजाने वारंवार वीजपुरवठा खंडित करावा लागत आहे, असे ऑपरेटर व्ही. एस. कांबळे यांनी स्पष्ट केले.