

तळणी : मंठा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अंभोरा (शेळके) शिवारात शेतकऱ्याच्या सिंचनासाठी बांधलेल्या विहिरीचे मोठे नुकसान झाले. विहीर पूर्णपणे खचून जमिनीत गाडली गेल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ऐन खरीप हंगामात सिंचनाचा प्रमुख आधारच नष्ट झाला आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.
खोरवड येथील शेतकरी अशोक पुंजाजी चोरमारे यांची अंभोरा (शेळके) शिवारातील गट क्र. १३२ मध्ये शेती आहे. शेतीसाठी कायमस्वरूपी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी विहीर बांधली होती. मात्र, गुरुवारी (दि.३०) रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे विहिरीचा कडा खचला आणि काही क्षणांत संपूर्ण विहीर माती, दगड व चिखलाखाली गाडली गेली.
घटनास्थळी विहिरीचे अस्तित्वच जवळपास नाहीसे झाले आहे. विहिरीत मोठ्या प्रमाणावर चिखल व पाणी साचले आहे. विहिरीलगतची जमीनही मोठ्या प्रमाणावर खचल्याने शेतीचे नुकसान झाले.
या घटनेमुळे खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रमुख स्रोतच नष्ट झाला आहे. त्यामुळे पिकांचे भवितव्य धोक्यात आले असून विहिरीच्या पुनर्बांधणीसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी चोरमारे यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्थानिक शेतकऱ्यांनीही प्रशासनाने विलंब न करता पंचनामा करून मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पाहणी करावी
शेतकरी अशोक चोरमारे यांनी मंठा तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे. महसूल विभागाने घटनास्थळी पाहणी करून शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.