

कन्नड : तालुक्यातील लंगडा तांडा येथे गुरुवारी (दि. ३१) झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंडा नदीला पूर आला आणि पुलावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क काही काळ तुटला. याच पुलावरून जिल्हा परिषद शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने शिक्षकांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून लहान विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन व हात धरून सुरक्षितपणे गावात पोहोचविले. शिक्षकांच्या या धाडसी कृतीमुळे संभाव्य अनर्थ टळला.
लंगडा तांड्यात गावठाणात शाळेसाठी जागा उपलब्ध नसल्याने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर आहे. गाव आणि शाळेदरम्यान गौताळा पर्वतरांगांतून उगम पावणारी कुंडा नदी लागते. पावसाळ्यात या नदीवरील पूल अनेकदा पाण्याखाली जात असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते.
३१ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. यावेळी शिक्षकांनी प्रसंगावधान राखत लहान विद्यार्थ्यांना खांद्यावर घेऊन आणि हात धरून सुरक्षितपणे पूल ओलांडून गावात आणले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून शिक्षकांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, पुराच्या पाण्यात एक बैलही वाहून गेला होता. मात्र, तो पोहत काठावर आल्याने त्याचा जीव वाचला.
पुलाची उंची वाढवा
दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कुंडा नदीवरील पुलाचे उंचीकरण करावे किंवा पर्यायी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण यांनी केली.