पुढारी ऑनलाईन डेस्क
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे आणि सगेसोयऱ्यांचा अध्यादेश तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेले उपोषण आज बुधवारी स्थगित केले. आता उपोषण सोडून समाजामध्ये जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे सांगितले.
सलाईन लावून उपोषण करण्यात काही अर्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला १३ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजाने चिंता व्यक्त केली होती. यामुळे आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती. त्यानुसार जरांगेंनी आज उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
जात वैधता प्रमाणपत्राची मुदत वाढ देत असताना एसईबीसी, कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा. ज्या मराठ्यांची नोंद सापडली, त्या मराठ्यांना म्हणजे मागील त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं, हे मार्गी लावा. हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट व सातारा संस्थान ही तिन्ही गॅझेट लवकरात लवकर लागू करा, अशी मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत.
माझ्या समाजासाठी मी उपोषण केले. माझ्या शरीराला काय त्रास होत आहे, याची जाणीव मराठ्यांच्या नेत्याला नाही. ते नेत्याची बाजू घेता घेता समाजाच्या विरोधात बोलत आहेत. प्रवीण दरेकर आणि छगन भुजबळ यांचे रक्त एक झाले की काय ? कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती. फक्त माझे उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो, असा इशारादेखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.