वडीगोद्री (जालना), पुढारी वृत्तसेवा : Manoj Jarange on Bhujbal : मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही हे माहीत नाही. पण मी समाजासाठी जीवाची बाजी लावणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रासह देशभरातील मराठा समाज मोठ्यासंख्येनं रस्त्यावर उतरला तरी सरकारला काही फरक पडलेला नाही. कोणी मध्यस्थी केली तर फरक पडेल का? हे माहीत नाही. पण, आता आमचं ठरलंय, येत्या 20 तारखेचं आमरण उपोषण कठोर करून सरकारच्या तोंडचं पाणी पळाले पाहिजे. त्या पुढची तयारीही आम्ही केली आहे, असे इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते सोमवारी (दि. 15) अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली यावर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया देत भुजबळांवर हल्लाबोल केला. दोन समाजात स्फोटक परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आहे. ओबीसी नेत्यांना हाताशी धरून कोयत्याची भाषा केली. गोरगरीब संपले पाहिजे हा छगन भुजबळ यांचा उद्देश आहे. भुजबळांना ज्यांनी मोठं केलं, त्यांनाच ते बेईमान झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्री केले. तुरुंगात जाण्यापासून वाचवले. तरी त्यांच्या बद्दल भयानक बोलत होते. नरेंद्र मोदींवर टीका केली. शिवसेनेने मोठं केलं तरी त्यांनी शिवसेनाच फोडली. शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं, मात्र त्याच पवारांचा योग्यवेळी त्यांनी कार्यक्रम वाजवला. (Manoj Jarange on Bhujbal)
भुजबळांना आता शांतता शब्द वापरून आणि राज्यात दंगली लावून द्यायच्या आहेत, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले, आपलं स्वत:चं घर कसं भरेल हेच भुजबळ बघत असतात. ते अतीबेईमान असून कोणत्याही जातीत असा माणूस जन्मू नये. त्यांच्या सारखा घातकी माणूस पृथ्वी तलावर नसेल, असा टोला लगावत मी मराठा आरक्षण ओबीसीतूनच मिळवणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
सामान्य ओबीसी आणि मराठा गावागावात भावासारखे राहतात. मात्र आधी छगन भुजबळ व्यवस्थित राहिला असता तर आज राहुल गांधी आणि मोदींकडे जायची वेळ आली नसती. आजवर मी धनगर, ओबीसी आणि मुस्लिम यापैकी एकाही माणसाला दुखावलं नाही. हे भुजबळ मराठ्यांच्या नोंदी रद्द करा असे म्हणत आहेत. किती मूर्ख माणूस आहे हा, अशी बोचरी टीकाही यावेळी जरांगे पाटील यांनी केली.