

अंबड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा पुढील टप्पा रस्त्यावरून लढण्याची घोषणा केल्यानंतर अंतरवाली सराटी येथील मंडप व व्यासपीठ काढण्यात आले असले, तरी आंदोलनाचे केंद्र अंतरवाली सराटीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयातून सुट्टी मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी (२९) दुपारी थेट अंतरवाली सराटी गाठून गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर ते समर्थ कारखाना परिसरातील आपल्या निवासस्थानी रवाना झाले.
आंदोलनाचा पुढील टप्पा बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून सुरू होणार असल्याने अंतरवाली सराटी येथे सध्या उपोषण होणार नाही. मात्र, दर शनिवार-रविवारी बैठका व समाजबांधवांच्या भेटीगाठी अंतरवालीतच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंतरवाली सराटीशी आंदोलनाचे नाते कायम राहील, असे जरांगे यांनीही यापूर्वी स्पष्ट केले आहे.
अंतरवालीतील आंदोलनस्थळी गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, अंतरवाली सराटीतील लढा आपण कधीही विसरणार नाही. आंदोलनाचा पुढील टप्पा पाटोदा येथून सुरू करून मुंबईपर्यंत नेण्यात येईल. मंडप व व्यासपीठ काढले असले तरी आंदोलन थांबणार नाही. समाजाने संयम राखून पुढील लढ्यासाठी तयार राहावे. “गुलाम व्हायचे नाही, प्रसंगी मरू पण मागे हटणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
शासनाकडे प्रमुख मागण्या आणि इशारा
सरकारने मोडी भाषा वाचक उपलब्ध करून देण्यास सांगितल्याने ते उपलब्ध करून दिले आहेत. आता त्यांना आवश्यक अधिकार देऊन कुणबी नोंदी शोधण्याचे काम तातडीने करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेटिअरमध्ये मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदीला अधिकृत अधिष्ठान देणारा सुधारित शासन निर्णय काढावा, तसेच कोल्हापूर व सातारा गॅझेटिअर काढावेत. सरकारने तीन महिन्यांत ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून १७ डिसेंबर २०२६ पूर्वी प्रमाणपत्रे द्यावीत, तसेच आंदोलनादरम्यान मराठा तरुणांवर दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत. त्यांच्यावर कितीही आरोप किंवा षड्यंत्र झाले तरी आरक्षणाच्या मागणीपासून आपण हटणार नसून, पुढील १५ दिवसांत अनेक बाबींचा खुलासा करून समाजासमोर सर्वकाही स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.