

वडीगोद्री : छगन भुजबळ यांनी अनेक पानांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तर आम्हाला तिचा काहीच फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी 8 पाणी पत्र लिहून मराठा आरक्षण जीआरबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली आहे. यावर बोलताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भुजबळांना मराठ्यांच वाटोळं करण्याची सवय लागली आहे, मराठ्यांनो सावध रहा असे मनोज जरांगे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस कोणाचही ऐकणार नाही, याची आम्हाला खात्री आहे असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे. आमच्या जीआर मध्ये हेराफेरी होणार नाही असं सांगत जर जीआर मध्ये काही हेराफेरी झाली, तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, जर भुजबळ कोर्टात गेले, की आम्ही पण 1994 च्या जीआर संदर्भात कोर्टात जाणार असल्याचं ही ते म्हणाले.
जीआर सरकारने काढला आहे, तूम्ही काय सरकारचे मालक आहात का? असा निशाणा मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर साधला. सरकार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री हे शहाणे नाही? तुम्हीच जास्त शहाणे आहे का? असे ही मनोज जरांगे मंत्री भुजबळ यांना उद्देशून म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ यांना जेल मध्ये टाकावं असं म्हणत भुजबळ म्हणजे सरकारला लागलेली साडेसाती आहे, भुजबळ सरकारला लागलेली मोठी कीड आहे अशा कठोर शब्दात मनोज जरांगे यांनी भूजबळ यांच्यावर थेट टिका केली आहे.