

Manoj Jarange Kunbi certificates deadline
वडीगोद्री : मराठवाड्यातील मराठा समाजाला १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास सरकारविरोधात कठोर निर्णय घेण्याचा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे नोंदी आढळल्यास तत्काळ प्रमाणपत्र द्यावे, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. अन्यथा दसरा मेळाव्यात भूमिका जाहीर केली जाईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
अंतरवली सराटी येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात जरांगे पाटील बोलत होते. मुंबईतील आंदोलनानंतर गावात प्रथमच परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी औक्षण केले, गुलालाची उधळण व फुलांची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली. या स्वागताने भावूक झालेल्या जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा दिला.
ते म्हणाले, “हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र द्या, अन्यथा महाराष्ट्रभर आम्ही गावबंदी आंदोलन पुन्हा छेडू. समाजाने दोन वर्षांत आरक्षणाच्या लढाईत ९६ टक्के यश मिळवले आहे. उर्वरित प्रक्रियाही पूर्ण होईल. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठे १०० टक्के ओबीसीत सामील होणार आहेत.”
छगन भुजबळांचा नामोल्लेख करत त्यांनी इशारा दिला, “जर तुम्ही आमच्या मुळावर उठलात, तर आम्हालाही तुमच्या मुळावर उठावे लागेल. १९९४ च्या जीआरला आम्ही कोर्टात आव्हान देऊ. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घ्यावा. नाहीतर आम्हाला दसरा मेळाव्यात कठोर भूमिका जाहीर करावी लागेल.”
जरांगे पाटलांनी पुढे सांगितले, “गुन्हे मागे घेतले जातील, आम्ही कुणावर हल्ला केला नाही. पण १७ सप्टेंबरपर्यंत मराठ्यांच्या हातात कुणबी प्रमाणपत्र दिसले पाहिजे. मराठा समाजाचा विजय झालेला असला तरी अजून अनेकांना तो पचत नाही. त्यामुळे सरकारने तात्काळ भूमिका जाहीर करून गोंधळ टाळावा.”