

Maize cultivation on 450 hectares in Pimpalgaon Renukai area
पिपंळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात जवळपास ४५० हेक्टर क्षेत्रावर मकाची लागवड करण्यात आली असून कोवळी पिके शेतात डोलू लागली आहेत.
पिंपळगाव रेणुकाई परिसरात यावर्षी मकाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. जवळपास शंभर ते दोनशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली होती. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे बऱ्यापैकी मकाची उगवणशक्ती चांगली झाली. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंचनवर मका लावली होती ती मका शेतात डोलत आहे.
मोठा पाऊस पडल्यास उर्वरित पिकांची उगवणशक्तीसाठी चांगली होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अद्यापपर्यंत चांगला पाऊस झालेला नसल्याने कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग, मका, मिरची आदी पिकांची म्हणावी तशी वाढ झाली नाही.
यामुळे चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. काही भागात पावसाअभावी पेरणी खोळंबली आहे. वादळी वाऱ्यामुळे मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.