

Irregularities in 2500 property records in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील अडीच हजार मालमत्ता पत्रकात अनियमितता आढळून आली असून १५४ मालमत्ता पत्रक बोगस आढळून आले आहेत. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जालना शहरात ४५ हजार मालमत्ता पत्रकधारक असून त्यापैकी ३५ हजार मालमत्तांचे मॅपिंग झाले आहे. जालना शहरात मालमत्ता पत्रकाबाबत मोठ्या संख्येने तक्रारी आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकानी नेमलेल्या समितीने २०२४ ला याबाबत चौकशी समिती नेमली होती.
या समितीमध्ये बारा जणांचा समावेश होता. समितीने नुकताच चौकशीचा अहवाल दिला. त्यात शहरातील अडीच हजार मालमत्ता पत्रकात अनियमितता आढळली असून १५४ मालमत्ता पत्रक बोगस असल्याचे समोर आले आहे. भूमिअभिलेखच्या नियमानुसार एक प्रॉपर्टी एक नकाशा असावा. मात्र शहरात अनेक नागरिकांनी खरेदी खत केले मात्र नकाशा केलेला नसल्याचे चौकशीत आढळून आले आहे. मालमत्तांचे रिनंबरीकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. त्यात अडीच हजार मालमत्तापत्रकांचे रिनंबरीकरण करण्यात येणार आहे.
गेल्या तीस वर्षांपासून अनियमित मालमत्ता पत्रकाचा प्रकार सुरू असल्याचे ऐकावयास मिळाले. समितीने १५४ मालमत्ता पत्रक बोगस असल्याची पहिली यादी दिली असली तरी यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
अनियमितता आढळून आलेल्या मालमत्तापत्रकांची यादीही समितीने जाहीर केली आहे. शहरात बोगस मालमत्ता पत्रक तयार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट मागील काही वर्षांपासून कार्यरत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून ऐकावयास मिळत आहे. चौकशीत संशयास्पद आढळून आलेल्या मालमत्ता पत्रकधारकांना त्यांचे म्हणने मांडण्याची संधी देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षात जालना शहरात वाढलेल्या जमिनी व प्लॉटच्या किमतीमुळे मालमत्ता पत्रक बोगस तयार करणारे सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सर्व्हे क्र. ५५८, ५५९, ५६० बाबत विधानसभेत तक्रार केली होती. याची चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. या प्रकारणातील चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सहा जणांचे पथक तयार केले होते.
शासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या पवित्र अॅपमधे नकाशांचे मॅपिंग केले जाणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. सदरचे काम खासगी कंपनीकडून सुरू असल्याचे समजते.