

Lower Dudhana Project water level at 70%, 4 gates opened
परतूर, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांपासून निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या प्रकल्प अहवालानुसार मागील २४ तासात सरासरी २ हजार ३७ क्युसेक दराने पाण्याची आवक सुरू झाली आहे.
३४४ दलघमी एवढी साठवण क्षमता असणाऱ्या प्रकल्पात सध्या २६९ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रकल्पातील एकूण जिवंत साठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. प्रकल्प परिसरातील बाधित जमिनीचे भूसंपादन होई पर्यंत प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठवण्यात मनाई असल्याने प्रकल्प प्रशासनाने पाण्याच्या विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार सोमवारी सकाळी ८ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ०.२० मीटरने उघडण्यात आले आहेत. सकाळी ९ वाजता पुन्हा दरवाजे उघडण्यात आले. चारही दरवाजांमधून २६३८ क्युसेक दराने दुधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पाण्याची आवक विचारात घेतला पाण्याचा विसर्ग वाढविण्याची अथवा कमी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रकल्प प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
रिमझिम पाऊस
परतूर शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. रविवारी श्रेष्टी येथील नदीला आलेला पूर ओसरला असून वाहतूक सुरू झाली आहे.