

Continuous rains in Jalna district cause major damage to Kharif crops
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पूर आले आहेत. जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पातील पाणी पातळीतही या पावसामुळे वाढ झाली आहे. जालना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावात साडेसतरा फुट पाणी साठा झाला आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
जालना शहरात रविवारी रात्री संततधार पाऊस पडला. या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पहिल्यांदाच पूर आला. जालना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावातील पाणी पातळीत साडेसतरा फुटांपर्यंत वाढ झाली. साडेअठरा फूट क्षमेचा हा तलाव केव्हाही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेले आठ बंधारे पूर्णपणे भरल्याने कुंडलिका नदीला पूर आला आहे.
शहरातील बसस्थानकाच्या बाजुने वाहणारी सिना नदीही या पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसून आली. सिना नदीवर बांधण्यात आलेले दोन बंधारेही ओसंडून वाहताना दिसून आले. शहरातील श्रीकृपा रेसिडन्सी भागातील जवळपास पन्नास घरांमधे या पावसामुळे पाणी शिरल्याने नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला.
जालना शहरातील मॅजीस्टीक टॉकीज परिसरात रस्त्यावर झाड कोसळले. शहरातील काही भागात पावसामुळे पक्षी मेल्याच्या घटनाही घडल्या, जिल्ह्यातील पाच मंडळांत मागील चोवीस तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. भोकरदन तालुक्यातील विरेगाव येथे ७० मिमी, बदनापूर तालुक्यातील शेलगाव ६५, दाभाडी ६५, रो षणगाव ६५, अंबड तालुक्यातील वडीगोद्री ७५ मिमी पावसाची नोंद झाली.
सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत तालुक्यात गेल्या चोवीस तासांत ३५.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४७५ मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ७९.२१ टक्के एवढा आहे. भोकरदन, घनसावंगी, परतूर, बदनापूर, अंबड, मंठा व जाफराबाद तालुक्यांत जोरदार पाऊस पडला. पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी, मका, मूग व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात चोवीस तासांत पडलेला पाऊस कंसाबाहेर तर कंसात आजपर्यंत पडलेला एकूण पाऊस जालना ३२.०० (५२८.६०), बदनापूर ५३.४० (५०९.७०), भोकरदन २५.०० (४१८.५०), जाफराबाद २९.७० (४९४.७०), परतूर- १२.१० (४७३.६०), मंठा- २१.७० (४६२.१०), अंबड ५१.७० आठ(४५०.००), घनसावंगी- ४८.६० (५०२.००) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पातील पाणी पातळीत या पावसामुळे वाढ होण्यास मदत झाली आहे. मंठा तालुक्यातील तळणी भागात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी बांध फुटले असुन जमीन खरवडुन गेल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.