

Heavy rains in five mandals of Jalna district
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, मकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात कुलाबा वेधशाळेच्या वतीने सुरुवातीस रेड व नंतर ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आला होता.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत असतानाच रविवारी रात्रीपासून त्यात वाढ झाली. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत आठ तालुक्यांत गेल्या चोवीस तासांत ३५.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४७५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ७९.२१ टक्के एवढा आहे.
जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला या वर्षी प्रथमच पूर आला. त्यामुळे नदीपात्रात साचलेली वर्षभराची घाण पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली. भोकरदन तालुक्यातील जुई नदीला या पावसामुळे पहिलाच पूर आला.
बदनापूर तालुक्यातील शेलगाव, दाभाडी, रोषणगाव, भोकरदन तालुक्यातील विरेगाव अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात पावसाचे पाणी साचल्याने सोयाबीन, तूर, मूग, कपाशी, मकासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी तालुक्यातही अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले. या पावसामुळे जिल्ह्यातील ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्पातील पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जुन्या घरांच्या भिंतींची पावसामुळे पडझड झाली.