

Local body elections: Crowds gather to file nomination papers
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यातील तीन नगर पालीकांच्या निवडणुकीचे मतदान येत्या २ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परतुर, अंबड व भोकरदन येथील नगर पालीकेत इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. सोमवार १७ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व समर्थकांची गर्दी राहणार आहे.
अंबड न.प. अध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल
अंबड येथील नगर परिषद निवडणुकीच्या ११ प्रभागातील २२ सदस्यांसह नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी निवडणुकी होत आहे. या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी १४ नोव्हेंबर पर्यंत एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नव्हता.
शनिवार व रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसुन आले. अंबड नगरपालीकेत नगराध्यक्षपदासाठी चार तर सदस्य पदासाठी ४८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अंबड नगर पालीकेची निवडणुक यावेळी चुरशीची होणार असे चित्र आहे. शनिवार (१५) रोजी नगराध्यक्ष पदासाठी दर्शना राहुल खरात व सुवर्णा रामभाऊ लांडे अशा दोन उमेदवाराचे अर्ज दाखल झाले होते. तर सदस्यासाठी ६ जणांचे मिळून ८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. रविवारी सकाळपासूनच नगर पालीकेसमोर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. रविवारी देवयानी केदार कुलकर्णी व पटेल सना मुस्तकीन या दोन उमेदवारांनी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
रविवारी ४० सदस्यांनी अर्ज दाखल केले. शनिवार व रविवार या दोन दिवसात ११ प्रभागातील ४८ सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अध्यक्षपदासाठी महिला उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आज सहाय्यक निर्णय अधिकारी मनोज उकिरडे यांनी ४ सोमवारी शेवटच्या दिवशी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार असून उमेदवारांनी वेळेच्या आत उमेदवारी अर्ज दाखल करावे, अन्यथा उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे आवाहन केले आहे.
७काही तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन उमेदवारी अर्ज अपलोड होत नसल्याने शनिवार (१५) पासून ऑफलाइन अर्जाची नगरपरिषदेने विक्री सुरु केली असून १५ व १६ नोव्हेंबर या दोन दिवसात नामनिर्देशन पत्र हे अध्यक्ष पदासाठी तर ८७ नामनिर्देशन पत्र हे सदस्य पदासाठी विक्री करण्यात आले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने गर्दी वाढणार आहे.
आचारसंहितेचे पालन करा
निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्ष आचारसंहितेचा भंग करताना आढळून आल्यास, निवडणूक प्रशासनाकडून व संबंधित विभागाकडून त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे अवाहन तहसिलदार विजय चव्हाण तसेच सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी मनोज उकरडे यांनी केले आहे.