

One killed, five injured after car hits divider
शहागड, पुढारी वृत्तसेवाः कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे समुद्रातील पोहण्याच्या कि.मी. स्पर्धेत सहभाग नोंदवुन कुटुंबीय व अन्य स्पर्धकासोबत कारमधुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना चालकाचे कारवरील नियंण सुटल्याने कार डिव्हायडरवर धडकुन झालेल्या अपघातात जान्हवी राऊत (१४) ही ठार झाली तर कारमधील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोलापुर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अंबड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४ वरील डोणगाव शिवारात झाला.
छत्रपती संभाजीनगर येथील गजानन राऊत व सविता राऊत हे मुलगी जान्हवी व त्यांच्या नात्यातील रुद्राक्ष लोंढे या मुलासह कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे समुद्रात आयोजित १५ कि.मी. पोहण्याच्या स्पर्धेत जान्हवी व रुद्राक्ष यांनी सहभाग घेतला असल्याने त्यांना घेउन गेले होते.
जान्हवी व रुद्राक्ष यांनी या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर कार क्र (क्र.एम.एच.२० जी.ई.८८५६) मधुन सर्व जण छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना चालक गजानन राऊत हे सोलापुर-छत्रपती संभाजी महार्गावरील डोणगाव शिवारातुन जात असतांना त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर जावुन आदळली.
अपघातानंतर कारने हवेत अनेक पलट्या खालल्याचे प्रत्यक्षदर्शीन सांगीतले. अपघातात गजानन राऊत (३५), सविता राऊत ( ३०), रुद्राक्ष लोंढे (११), गणेश लोंढे (३२), आरवी राऊत (१६) हे गंभीर जखमी झाले. राऊत कुटुंबीय हे छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे स्टेडीयम जवळ राहात असल्याची माहीती सुत्रांनी दिली. एन. एच. आय. च्या रुग्णवाहिकाने जखमी व मृतांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेले. घाटी रुग्णालयात जानव्ही राऊत हिचे शवविच्छेदन करण्यात येउन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. एन.एच. आय रुग्णवाहिकेचे डॉ. महेश जाधव, सहाय्यक गणेश चिडे, रवि गाढे, बाळासाहेब काटे, यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
कार चालक गजानन राऊत यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर धडकुन अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघात झाल्यानंतर तातडीने अपघातग्रस्तांना मदत करण्यात आली. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. मात्र तातडीने ती पुर्ववत करण्यात आली. अपघातातील जखमींना डोक्याला व पायाला मार आहे.