

The heavy rains have ended, but the cold has intensified!
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असली तरी त्यानंतरच्या समस्या अधिक गंभीर बनल्या आहेत. गोदाकाठच्या परिसरातील गावांमध्ये हजारो कुटुंबे अद्याप विस्थापित अवस्थेत आहेत. आता पारा सातत्याने घसरत आहे. यामुळे उबदार कपडे मिळावेत, अशी मागणी एकल महिला, निराधार, निराश्रीतांकडू होत आहे.
दरम्यान, पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरांचे अवशेष, ओलसर कपडे, भिजलेले अंथरूण-पांघरूण आणि रो-गराईचा धोका या सगळ्यांनी जनजीवन विस्कळीत केले आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरु झाली असून, या थंडीत उबदार कपड्यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेकांच्या घरात अंग झाकायला साधे चादर-पांघरूणही शिल्लक नाही. छोट्या मुलांना आणि वृद्धांना थंडीचा विशेष फटका बसत आहे. आरोग्यविषयक समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या पावसात सुमारे ६ हजार कुटुंबे आपत्तीत सापडली. त्यातील अनेकांचे घर कोसळले, काहींचे संसारपयोगी साहित्य वाहून गेले.
स्थानिक प्रशासनाने तात्पुरती निवारा केंद्रे सुरू केली असली, तरी पुरेशी मदत अद्याप मिळालेली नाही. समाजसेवी संस्था कार्ड, समाजभान, साऊ एकल महिला आर्दीसह इतर संस्था तसेच स्थानिक युवक आणि ग्रामस्थ यांनी काही ठिकाणी मदत मोहीम राबवली असली तरी ती अपुरी पडत आहे. आता सर्वाधिक गरज आहे ती उबदार कपड्यांची, ब्लॅकेट्सची. उबदार कपडे मिळावेत, सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अपेक्षा आपत्तीग्रस्तांतून व्यक्त केल्या जात आहे.
या संस्थांनी केली होती मदत
नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ शासनासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात आली होती. जालन्याच्या कार्ड संस्थेसह समाजभान, साऊ एकल महिला आदी संस्थांनी रेशन किटचे वाटप केले होते. त्यानंतर स्थानिक सजग नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर आपआपल्या परिने मदत केली होती.