

Leopard terror spreads in Amba area
परतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आंबा शिवारासह परिसरातील वडगाव, तसेच दुधना नदीच्या काठावर बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांचे धाबे दणाणले आहे. काही शेतकऱ्यांनी बिबट्या प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला असून, बिबट्याच्या दहशतीमुळे एक शेतकरी भीतीने आजारी पडल्याची माहिती ऐकावयास मिळाली.
आंबा परिसरात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. आंबा शिवारात शेतकरी शिवाजी जाधव यांना बिबट्या दिसल्याने ते भयभीत होऊन आज-ारी पडले. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, बिबट्याचे वास्तव्य प्रामुख्याने दुधना नदीच्या काठावर असण्याची शक्यता आहे.
नदीच्या काठावर बिबट्याच्या पावलांचे ठसे (पाऊलखुणा) आढळल्यामुळे ग्रामस्थांचा हा दावा अधिक बळकट झाला आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे आंबा, वडगाव आणि दुधना काठावरील परिसरातील शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत आहेत.
वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.