

Large-scale outbreak of lalya on cotton crops
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : निसर्गाच्या लहारीपणामुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांपुढे आता नवीन संकट उभे झाले आहे. खरिपातील सोयाबीनचे पीक हातून गेल्यानंतर आता शेतकऱ्यांची कापसावर भिस्त होती. मात्र, सध्या कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून नोव्हेंबर महिन्यातच कपाशीचा सुपडासाफ झाला आहे.
यावर्षी भोकरदन तालुक्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने खरीप हंगाम पूणर्तः शेतकऱ्यांच्या हातून गेला आहेत. मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने कापसाची बोंडेही भिजली. त्यामूळे आता कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील अनेक शेतातील कापूस पिकांवर लाल्या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे.
कापसाची हिरवीगार पाने लालसर पडून वाळू लागली आहेत. त्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. याचा उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच सोयाबीन पीक वाया गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कापसावर भिस्त होती. लाल्या रोगाने कापसावर अतिक्रमण केल्याने कापसाच्याही उत्पन्नाची आशा मावळली आहे.
परतीच्या पावसाचा कहर त्यात कापसावर विविध रोगांचे आक्रमण व कपाशी वेळेआधीच लाल पडल्याने झाडावरील पक्वान्न झालेली बोंडे फुटून मोकळी झाली. परिणामी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणार कापसाचा हंगाम नोव्हेंबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहेत.
बळीराजा भरडला
गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, रोगराई व नैसर्गिक आपत्तीत बळीराजा भरडला जात आहे. कोणत्याच पिकाला भावाची जोड मिळत नसल्याने शेती हा व्यवसाय परवडणारा नसल्याने अनेकांनी या व्यवसायातून अंग काढणे सुरू केले आहे.