

जालना : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिक गरम कपड्यांची खरेदी करताना दिसून येत आहेत. बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, मफलर, शाल यांची मागणी वाढली आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभुमीवर बाजारात स्टाईलीश स्वेटर, मफलर, हुडीचे नवीन प्रकार विक्रीसाठी आले आहेत.उबदार कपडे विक्री करणाऱ्या दुकानांमधे सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
वाढत्या थंडीच्या पार्श्वभुमीवर सर्वच वयोगटातील नागरिक बाजारात कपडे खरेदी करताना दिसत आहेत. स्वेटर विक्रीसाठी शहरात परराज्यातुन आलेल्या व्यावसायीकांनी दुकाने थाटले आहेत.यावर्षी थंडी जास्त असल्याने गरम कपड्याच्या विक्रीत चांगली वाढ झाल्याने व्यावसायीकांना चांगला फायदा झाला आहे.
आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला आहे की, थंडीमध्ये शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांनी गरम कपडे वापरणे आवश्यक आहे. शहरात थंडीचा प्रभाव अजून काही दिवस राहण्याची शक्यता असल्याने कपड्यांच्या बाजारपेठेत सतत गर्दी आणि मागणी वाढत राहणार आहे.
थंडीचा कडाका वाढल्याने शहरातील बाजारपेठांमध्ये स्वेटर, जॅकेट आणि उबदार कपड्यांची विक्री वाढली आहे. रस्त्यावरील काही दुकानात स्वेटर, जॅकेट, मफलर आदी हिवाळी कपडे चांगल्या दर्जात आणि वाजवी दरात मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत आहे. दुकानदारांनी महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि मुलांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, जॅकेट, शाल, मफलर आणि हुडीचे नवीन कलेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.
लहान मुलांसाठी आकर्षक रंग आणि कार्टून डिझाइन्स असलेले स्वेटर बाजारपेठांमध्ये मिळत आहेत. किशोरवयीनांसाठी ट्रेंडी हुडी, स्टायलिश जॅकेट उपलब्ध आहेत. महिला वर्गासाठी रंगीबेरंगी फॅशनबल स्वेटर, शाल आणि स्टायलिश जॅकेट बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. पुरुषांसाठी फॉर्मल लूक देणारे स्वेटर, जॅकेट आणि मफलर उपलब्ध आहेत. दुकानदारांच्या मते, दरात सुमारे 10 ते 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
असे आहेत दर
हातमोजे -- 180 ते 250, स्वेटर -- 500 ते 900, लहान मुलांचे हाफ स्वेटर -- 450 ते 1000, नवीन प्रकार -- 900 पासून सुरू. महिला- स्वेटर 800 ते 1500. फॅशनेबल स्वेटर -- 1500 ते 2000 पर्यंत. स्टॉल /शाल 300 ते 400. पुरुष स्वेटर -- 800 ते 1000. ट्रेंडी हुडी -900 ते 1200. वूलन स्वेटर -- 1300 पासून सुरू. मफलर आणि कानटोपी -- 250 ते 400