

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेला पाच वर्षांनंतर नवे कारभारी मिळणार आहेत. त्यामुळे या पदाधिकारी व नगरसेवकांच्या आगमनासाठी महापालिका प्रशासन युद्धपातळीवर तयारीला लागले आहे. यात महापौर निवडीच्या पहिल्या सभेसाठी सर्वसाधारण सभेचे सभागृह आणि महापौर, उपमहापौर, विरोधीपक्ष नेते आणि सभागृहनेते यांचे दालन नूतनीकरणासह सज्ज केले जात आहे. येत्या 20 दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे यांनी दिली.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभागृहाची अतिशय दुरवस्था झाली होती. गेल्या 37 वर्षांत केवळ एक ते दोन वेळाच या सभागृहाचे काम करण्यात आले. त्यातही वॉटरप्रूफिंग आणि साऊंडसिस्टीमचेच काम करण्यात आले होते. परंतु यंदा महापालिकेने या सभागृहाचा संपूर्ण चेहरामोहराच बदला आहे.
अगदी नव्याप्रमाणेच या सभागृहाचे संपूर्ण काम करण्यात आले आहे. यात 115 नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेसह महापौर, उपमहापौरांच्या बैठक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक साऊंड सिस्टीमबाबत ओरड करीत होते. परंतु यंदा सर्व सिस्टीम बदलून नव्याने टाकण्यात आली आहे. त्यासोबतच विद्युत आणि एसी सिस्टीमही नवीन बसविण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता तनपुरे यांनी दिली.
महापौर-उपमहापौरांचे दालन सज्ज
महापौरांसह उपमहापौर, सभागृहनेता आणि विरोधी पक्षनेता या चार पदाधिकार्यांचे दालन मागील पाच वर्षांपासून बंद होते. या दालनामध्ये प्रशासनाने विविध दालनातील भंगार ठेवले होते. तसेच काही संचिका देखील ठेवण्यात आल्या होत्या, परंतु निवडणुका होणार याबाबत संकेत मिळताच प्रशासनाने निविदा काढून नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे. येत्या 15 दिवसांत हे काम पूर्ण करून दालन सज्ज केले जाणार आहे.
महापौर बंगल्याचीही साफसफाई
रेल्वेस्टेशन येथे महापौरांचे शासकीय निवासस्थान आहे. मागील 5 वर्षांपासून हा महापौर बंगलाही देखभाल दुरुस्तीविना बंद होता. त्यामुळे आता या निवासस्थानच्या देखभाल दुरुस्तीचे कामही प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.