

jalna Talk of Irregularities at Jalna Merchant Bank; Stir Among Customers
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेत अनियमितता झाल्याच्या चर्चेमुळे ठेवीदारांमधे खळबळ उडाली असून गुरुवार पासूनच बँकेत पैसे काढण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत आहे.
जालना शहरात व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चेंट बँकेत अनियमितता झाल्याच्या चर्चेमुळे ठेवीदारात प्रचंड खळबळ उडाली आहे. व्यापाऱ्यासह जालना शहरातील छोटे व्यावसायिक सर्वसामान्य नागरिकांनी बँकेस सेव्हिंग अकांउंटसह विविध ठेवींच्या माध्यमातून पैसे जमा केले होते. या बँकेची जवळपास दीडशे ते दोनशे कोटींची उलाढाल असल्याची माहिती ऐकावयास मिळाली.
बँकेची स्थापना ५ एप्रिल १९९८ रोजी झाली असून बँकेला आरबीआयने परवाना १९ सप्टेंबर १९९७मध्ये दिला आहे. बँक सातत्याने अ ऑडिट वर्गात असल्याने बँकेवर ठेवीदारांचा विश्वास वाढला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून बँकेत अनियमितता झाल्याच्या चर्चेने मोठ्या संख्येने ठेवीदार बँकेत ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करीत
असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बँकेतील अनियमिततेमुळे गेल्या चार दिवसांपासून ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, बँकेच्या शहरातील नऊ शाखांबाहेर पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आयुष्यभराची कमाई अडकण्याच्या भीतीने ठेवीदारांमध्ये संताप आणि चिंतेची लाट उसळली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या प्रकरणात तक्रारी प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. संबंधित कागदपत्रांची छाननी सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.