

जालना : वारसा हक्काने फेरफार नोंद करण्यासाठी शेतकऱ्याकडून लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची कारवाई बुधवारी, दि. 28 करण्यात आली. गजानन मनसाराम बारवाल (36), व्यवसाय नोकरी, पद ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), वर्ग-3, नेमणूक सिंधी काळेगाव सजा, ता. भोकरदन, जि. जालना, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार पुरुष (वय 42) यांचे वडील मयत झाल्यानंतर त्यांच्या वडिलोपार्जित शेतीची वारसा हक्काने फेरफार नोंद करून ती फाईल मंडळाधिकाऱ्याकडे पाठवण्यासाठी आरोपी तलाठ्याने 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. दि. 27 रोजी तक्रारदाराने सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र लाच रक्कम दिल्याशिवाय काम केले जाणार नसल्याचे आरोपीने सांगितल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत ला.प्र.वि कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दि. 28 रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडे फेरफार नोंद करून फाईल पुढे पाठवण्यासाठी 5 हजार रुपयांची मागणी कायम ठेवत तडजोडीनंतर 3 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
लाचेची मागणी केल्यास संपर्क
आरोपीकडून लाचेची रक्कम, वनप्लस मोबाईल तसेच वैयक्तिक खर्चाची रक्कम जप्त करण्यात आली असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीविरुद्ध तालुका पोलिस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईचे नेतृत्व पोलिस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी केले असून, तपास पोलिस निरीक्षक कोमल शिंदे करत आहेत. लाच मागणी झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन ला.प्र.वि. प्रशासनाने केले आहे.