Jalna Sina Riverfront project : सीना नदीकाठी नवा ऑक्सिजन झोन होणार

नदीकाठचे संवर्धन व जमिनीची धूप रोखण्यासाठी विस्तीर्ण घनवन प्रकल्प उभारणार
Jalna Sina Riverfront project
जालना : शहरातील सीना नदीकाठचे संवर्धन होऊन जमिनीची धूप थांबविण्यासाठी विस्तीर्ण घनवन उभारण्याचे काम जेसीबीव्दारे सपाटीकरणाचे काम सुरू आहे. वृक्ष लागवडीसाठी पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : सीना नदीचे नैसर्गिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासोबतच शहरालगत पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या 'सीना रिव्हरफ्रंट विकास' प्रकल्पाच्या कामाला मोठी गती मिळाली आहे. पोलाद स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक तथा उद्योगपती सतीश अग्रवाल यांच्या २१ लाख रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सीएसआर निधीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत आहे. नदीच्या काठावर सुमारे ११ मीटर रुंद आणि तब्बल १.२५ किलोमीटर लांब पट्ट्यात विकसित केले जाणारे हे घनवन सीना नदीकाठच्या जमिनीची धूप रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

पावसाळ्यात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीकाठची जमीन वाहून जाण्याचा धोका असतो. यावर शाश्वत उपाय म्हणून या विस्तीर्ण पट्ट्यात देशी वृक्षांचे घनवन उभारले जात आहे. या प्रकल्पामुळे नदीपात्राचे रक्षण तर होईलच, शिवाय शहरालगत मोठ्या प्रमाणावर जैवविविधतेचे संवर्धन होऊन एक नैसर्गिक हरित कवच तयार होईल.

Jalna Sina Riverfront project
Cattle fodder crisis : दुष्काळात जनावरांच्या चाऱ्याची जुळवाजुळव

प्रकल्पाचे नियोजनबद्ध काम सुरू असून प्राथमिक सुविधांची उभारणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यात प्रामुख्याने घनवनासाठी निश्चित केलेल्या संपूर्ण १.२५ किलोमीटर क्षेत्राचे सपाटीकरण पूर्ण करण्यात आले असून, रोपांच्या कायमस्वरूपी संगोपनासाठी स्वतंत्र बोर घेऊन त्यावर विद्युत पंप बसवण्यात आला आहे. पाण्याचा काटकसरीने व योग्य वापर व्हावा यासाठी आधुनिक ठिबक सिंचन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

रोपांचे जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी संपूर्ण पट्ट्याला मजबूत चेन लिंक (जाळीचे) कुंपण घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. विविध देशी व सावली देणारी वृक्षांची दर्जेदार रोपे प्रकल्पस्थळी प्राप्त झाली असून, ती सुरक्षित कुंपणात ठेवण्यात आली आहेत. लवकरच एका विशेष मोहिमेद्वारे त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने रोपण केले जाणार आहे.

Jalna Sina Riverfront project
Sambhajinagar water wastage : पाणी बचतीचे आवाहन; उधळपट्टी सुरूच

प्रकल्पाची प्राथमिक कामे पूर्ण झाल्यानंतर या संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. सीना नदीकाठच्या या नयनरम्य व शांत वातावरणामुळे नजीकच्या परिसरातील वसाहतींमधील नागरिक, ज्येष्ठ मंडळी आणि तरुण वर्ग येथे नियमित फेरफटक्यासाठी येत आहेत. भविष्यात हे ठिकाण जालना शहरासाठी एक मुख्य 'ऑक्सिजन पार्क' म्हणून ओळखले जाईल.

प्रकल्प वेळेत पूर्णत्वाचे प्रयत्न

हा पर्यावरणपूरक प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावा यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत महाजन, माजी अध्यक्षा वर्षा पित्ती, सचिव संदीप मुंदडा, रमेश मगरे आणि सुरेश मगरे प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी उपस्थित राहून दैनंदिन कामावर देखरेख ठेवत आहेत. तसेच कंत्राटदार आणि रोटरी क्लब यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधत कामाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल उदय शिंदे यांचे रोटरी परिवाराच्यावतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news