

डोणगाव : जाफराबाद तालुक्यातील डोणगाव परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, पशु पालक व शेतमजूर चाऱ्यांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत.
डोणगाव परिसरात सध्या खरीप हंगामातील पिकांच्या काढणी व सोंगणीचे काम सुरू आहे. सोयाबीन व मका काढल्यानंतर मकाचा कडबा व सोयाबीनचे भुस शेतकरी मिळेल तेथून जमा करून आणत आहेत.
पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होउन उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. बैल, गाय, म्हैस व इतर जनावरांना पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची टंचाई आगामी काळात जाणवणार आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालक चाऱ्याची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. जनावरांकरिता चारा छावणी सुरू करून प्रशासनाने चाऱ्याची सोय करून द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतमजूर व पशुपालक वर्गातून होत आहे.
दहा महिने कसोटीचे
जाफराबाद तालुक्यातील डोणगाव, निवडुंगा, आसरखेडा, पोखरी, सातेफळ, इस्लाम वाडी, बुटखेडा, अकोला देव, देळेगव्हाण, आंबेगाव वाडी परिसरत दुष्काळाची दाहकता वाढू लागल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर आगामी दहा महिने जाणार कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे.