

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शहरात मात्र पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. पाणी जपून वापरा, नासाडी टाळा, अन्यथा दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महापालिकेने दिला आहे. तरीही पाणीपुरवठा सुरू होताच रस्ते, ओटे, वाहने धुणे, पाणी रस्त्यावर सोडणे, तसेच नळांना तोट्या नसल्याने हजारो लिटर पाणी वाहून जाण्याचे प्रकार सुरू आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून व्यापक कारवाईचे नियोजन केले आहे. त्यामुळे तोपर्यंत होणारा पाण्याचा अपव्यय रोखणार कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.
जायकवाडीतील पाणीसाठ्यातून शहराचा वर्षभराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. महापालिका आयुक्त, महापौर आणि पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून पाणी बचतीचे आवाहन केले जात आहे.
घंटागाड्यांवरूनही पाणी बचतीचे संदेश दिले जात आहेत. यासह पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेने तीन टप्प्यांत दंडाची तरतूद केली आहे. पहिल्यांदा पाच हजार, दुसऱ्यांदा दहा हजार आणि तिसऱ्यांदा २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यानंतरही नासाडी सुरू राहिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या कारवाईला मंगळवार (दि.६) पासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत दोन नागरिकांना एकूण १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, कारवाड सुरू झाल्यानंतरही अनेक वसाहतींमध्य पाण्याची नासाडी थांबलेली नाही महापालिकेकडून पाणीपुरवट झाल्यानंतर रस्ते, ओटे आणि वाहने धुणे यासह पाणी रस्त्यावर सोडण्याचे प्रका सर्रास सुरू आहेत. काही ठिकाणी नळांन तोट्या नसल्याने पाणीपुरवठा बंब होईपर्यंत पाणी वाहत राहते. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा मोठ्ठ प्रमाणात अपव्यय होत आहे.
पाणी नासाडीचे फोटोसह व्हिडिओ
काही वसाहतींमधील पाणीपुरवठ्याचे टप्पे बदलण्यात आले आहेत. जुन्या वेळापत्रकाच्या तुलनेत दोन दिवस आधी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना नव्या वेळापत्रकानुसार नियोजन करावे लागत आहे. मात्र, पाणी भरून झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शहरालगतच्या वसाहती आणि ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना शहरात घरापर्यंत आलेले पाणी वाया घालविले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. शहरातील सुजाण नागरिकांकडून पाणी नासाडीचे फोटो आणि व्हिडिओ नगरसेवक, पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना पाठविले जात आहेत.
कारवाईकडे लक्ष
एकीकडे दुष्काळी परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जात असताना पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेने १५ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली आहे. जनजागृतीनंतर कारवाई करू, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तोपर्यंत होणारी पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी तत्काळ पावले का उचलली जात नाहीत, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दंडाची घोषणा आणि जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष नासाडीच्या ठिकाणी कारवाई कधी होणार, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पाण्याची नासाडी होत असेल तर कारवाई निश्चित होणार. आम्ही स्वतः शहरात फिरून नागरिकांना आवाहन करणार आहोत. पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात पाण्याची मोठी अडचण आहे. आपल्याला पाणी उपलब्ध आहे. त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे.
अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती, महापालिका