

Jalna Shahagad Road Accident
शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि.२९) सकाळी भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव सुनील बाबुराव वावरे (वय ४०) असे असून, जखमी पत्नीचे नाव अनिता वावरे (वय ३५) आहे. दोघेही दुचाकी क्रमांक एमएच १४ ईडी ५१८० वरून छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या मूळ गावी वावरे अंतरवाली (ता. गेवराई, जि. बीड) येथे जात होते.
शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास शहागड बसस्थानकाजवळील उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुनील वावरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिता वावरे यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे कर्मचारी रामदास केंद्रे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकातील बाळासाहेब काटे, पद्माकर जोगदंड आणि प्रकाश हंगारके यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच रुग्णवाहिका चालक लखन शिंदे आणि डॉ. राहुल कपाळे यांनीही तातडीची मदत केली.
मृत सुनील वावरे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी नरवाडे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.