

Jalna Seventy percent of drought relief funds distributed.
परतूर, पुढारी वृत्तसेवा परतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ७० ते ७२ टक्के दुष्काळी अनुदान वितरित करण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी अद्यापपर्यंत काढलेले नाहीत तसेच काही शेतकऱ्यांच्या त्रुटी आहेत अशा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान वाटपात अडचणी येत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे, असे अवाहन तहसीलदार दामोदर जाधव यांनी केले आहे.
तहसीलदार जाधव यांनी याबाबत सांगितले की, फार्मर आयडीसंदर्भात हे डिजिटल ओळखपत्र आहे. जो शेतकऱ्यांना सरकारच्या विविध योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे. या आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्र केली जाते. शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा फायदा मिळवण्यासाठी या माध्यमातून प्रक्रिया सुकर होते. शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र (कम्युनिटी सर्व्हिस सेंटर) किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी जाऊन आपले फार्मर आयडी बनवता येते.
येथे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुक, शेताचा सातबारा सादर करून फार्मर आयडी तयार केला जातो. दुष्काळी अनुदान वितरणासाठी शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अनिवार्य आहे. जर शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार नसेल किंवा त्यात त्रुटी असतील, तर त्यांना अनुदान मिळवण्यात विलंब होऊ शकतो. त्रुटी असलेल्या आयडीचे निराकरणः शेतकऱ्यांना त्यांचे आयडी तपासून त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी स्थानिक सीएससी केंद्र किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागतो.
फार्मर आयडी काढून घ्या
शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असेल तर शेतकऱ्यांना केवळ दुष्काळी अनुदानच नाही, तर विविध सरकारी योजना, कृषी सहाय्य, बिमा योजना, आणि इतर शासनाचे सवलती मिळवण्यासाठी मदत मिळते. यासाठी जास्तीत जास्त सर्व शेतकऱ्यांनी आपापले फार्मर आयडी काढून घ्यावे, असे तहसीलदार दामोदर जाधव यांनी सांगितले आहे