

जालना ः जालना शहरातील पोस्टाने मागवलेल्या तीन हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी सह एक दुचाकी असा 49 हजारांचा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने पकडला.
सदर बाजारचे डीबी पथकाचे प्रमुख पोउपनि सचिन सानप है गुरुवारी (दि.16) पोलिस ठाण्यात असताना त्यांना दुपारी एक वाजेच्या सुमारास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथे पार्सल येणार असून त्यात तलवार असण्याची शक्यता आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सापळा लावला असता एक इसम संशयित पार्सल घेण्यासाठी आला असता त्याने पार्सल स्वीकारल्यानंतर लगेच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली.
यावेळी त्याने सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. मात्र सदर पार्सल दोन पंचांसह पोलिस ठाण्यात आणून उघडले असता त्यामध्ये दोन धारदार तलवार मिळून आल्या. संशयित इसमाचे नाव अरविदसिंग विनोदसिंग (रा लोधी मोहल्ला जालना) असे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तीन हजारांच्या दोन तलवारीसह 45 हजारांची दुचाकी असा 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल , अप्पर पोलिस अधीक्षक आयूष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप भारती , डी. बी. पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सचिन सानप, जमादार जगन्नाथ जाधव, नजीर पटेल, भगवान मुंजाळ, गणेश तेेजनकर आदींनी केली.