

जालना : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जालना शहर पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत नॅशनल नगर परिसरातील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत 11 गोवंशांची अवैधरित्या कत्तल करण्यात आल्याचे उघड झाले असून पोलिसांनी सुमारे 7 लाख रुपयांचे गोवंश मांस जप्त केले. तसेच घटनास्थळावरून 13 जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे साडेअकरा लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझीरा पोलिसांनी ही कारवाई केली. गुरुवारी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नॅशनल नगर परिसरात धाड टाकली. संबंधित ठिकाणी सकाळपासून मोठ्या प्रमाणात गोवंशांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस अधिकारी बाळासाहेब पवार यांनी पथकासह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना तेथे मोठ्या प्रमाणात गोवंशांचे मांस आढळून आले. तसेच अनेक जनावरे बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 13 जिवंत गोवंशांची सुटका केली.
या प्रकरणी शेख मुस्ताक नूर मोहम्मद, रा. नॅशनल नगर, जालना हा व्यक्ती अनधिकृतपणे कत्तलखाना चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 7 लाख रुपयांचे गोवंश मांस तसेच 4.50 लाख रुपये किंमतीची जनावरे जप्त केली आहेत.
जालना शहरात खळबळ
राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असताना बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या अवैध प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.