

Jalna News: 20 bulls brought for slaughter rescued
जालना, पुढारी वृत्तसेवा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी निर्दयतेने डांबून ठेवण्यात आलेल्या २० गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल ६ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना जालन्यातील मोरांडी मोहल्ला येथील एका वाड्यात गोवंशीय जनावरे बेकायदेशीररीत्या कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २६ मे रोजी रात्री साडेएक वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने छापा टाकला.
याप्रकरणी शेख जुबेर शेख फिरोज व ग्यासोद्दीन कमरोद्दीन कुरेशी (रा. मोरांडी मोहल्ला, जुना जालना) यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जनावरांची सुटका
या कारवाईत ७ गायी व १३ बैल असे एकूण २० जनावरे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या गायी व ५ लाख २० हजार रुपये किमतीचे बैल असा एकूण ६ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.