Goats Death Jalna | शेताच्या बांधावरील बेकायदेशीर वीजतारेचा जीवघेणा सापळा; सहा शेळ्यांचा मृत्यू

अंबड तालुक्यातील रुई शिवारातील घटना; पशुपालकांचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान, तीर्थपुरी पोलिसांत गुन्हा दाखल
Goats Die Electrocution
Jalna Ambad Goats Die Electrocution Pudahri
Published on
Updated on

Jalna Ambad Goats Die Electrocution

सुखापुरी : शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर सोडण्यात आलेला बेकायदेशीर वीजप्रवाह सहा शेळ्यांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यातील रुई शिवारात घडली. विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने सहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेत पशुपालक संतोष लहू मुळे आणि संतोष बिडे यांचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष लहू मुळे हे शेतीसोबत शेळीपालन व्यवसाय करतात. २९ जुलै रोजी नेहमीप्रमाणे ते शेळ्यांना चारण्यासाठी रुई शिवारातील गट क्रमांक १४५ मध्ये गेले होते. सकाळपासून शेळ्या चारल्यानंतर दुपारी त्यांना पाणी पाजून परत आणत असताना शेताच्या बांधावर लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला सहा शेळ्यांचा स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने सहाही शेळ्या जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.

Goats Die Electrocution
Jalna News : हसनाबाद येथील पर्जन्यमापक यंत्र नवीन जागेत स्थलांतरित

घटना लक्षात येताच संतोष मुळे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्व शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संबंधित पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सतीश शंकर बनकर (रा. बनगाव, ता. अंबड) यांनी शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर बेकायदेशीररीत्या विद्युत प्रवाहाची तार लावली होती. जनावरे किंवा इतर प्राणी या तारांच्या संपर्कात येण्याची शक्यता असतानाही कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Goats Die Electrocution
Jalna News : पिस्तूल बाळगणारा तरुण जाळ्यात

या प्रकरणी संतोष लहू मुळे यांच्या फिर्यादीवरून तीर्थपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७६/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, संबंधित व्यक्तीची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीण भागात पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनधिकृतपणे वीजप्रवाह सोडण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. अशा प्रकारांमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसेच मुक्या जनावरांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असल्याने अशा जीवघेण्या विद्युत सापळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे. तसेच शेतांमधील अशा धोकादायक वीजजोडण्यांची तपासणी करून त्या तातडीने हटवाव्यात, अशीही मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news