

Jalna News: Property seized in connection with outstanding loan; action taken by SBI bank
शहागड, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील शहागड येथे भारतीय स्टेट बँक (एसबीआय) शाखेमार्फत पात्र व आर्थिकदृष्ट्या सक्षम खातेदारांना मोठ्या प्रमाणावर होम लोन देण्यात आले आहे. काही खा-तेदारांनी होम लोनची परतफेड न केल्याने संबंधित खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अॅसेट) ठरली आहेत. या पार्श्वभुमीवर एसबीआयच्यावतीने थकीत होमलोन असलेल्या कर्जदारांच्या घरांना पोलिस बंदोबस्तात सिल ठोकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शहागड हे बाजार पेठेचे गाव असुन येथे एसबीआय बँकेच्यावतीने मोठ्या संख्येने होमलोन देण्यात आले आहे. होम लोन हे मॉडर्गेज स्वरूपाचे कर्ज असल्याने, कर्जदाराची मालमत्ता ग्रामपंचायत व निबंधक कार्यालयात बँकेच्या बोजाखाली नोंदलेली असते. त्यामुळे कर्ज पूर्ण फेडल्याशिवाय सदर मालमत्तेची खरेदी-विक्री करता येत नाही.
कर्ज थकवल्यास मूळ रक्कम, व्याज, एनपीए झाल्यानंतर वाढीव व्याज, चेक बाऊन्स, न्यायालयीन खर्च, जप्ती व प्रक्रिया खर्च यांचा सर्व भार खातेदारावर पडतो. जमिनीचे मूल्यांकन, इमारतीचे स्थान (मुख्य रस्त्यावर असल्यास), बांधकामाची प्रशस्तता या सर्व बाबींच्या आधारे बँक होम लोन मंजूर करते. त्यामुळे अशा मालमत्तांबाबत बँक कोणतीही तडजोड करत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शहागड एसबीआय शाखेने १९ तारखेपासून गोंदी पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तात थकीत होम लोन खातेदारांवर कडक कारवाई सुरू केली आहे. थकीत कर्जदारांच्या इमारतींना कुलूप लावून सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईदरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील लोन वसुली अधिकारी गोरे, अंबड एसबीआयचे कौशिक, शहागड एसबीआयचे प्रशांत धेंडे, मंडळ अधिकारी बामनावात, तलाठी महाले, उपनिरीक्षक हरिदास जंगले, जमादार रामदास केंद्रे, फुलचंद हजारे, पोलीस कर्मचारी शेख वहाब, महिला पोलीस, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
कारवाई सुरूच राहणार
शहागड व वाळकेश्वर परिसरात सदर कारवाई जानेवारी, फेब्रुवारी व मार्च एंडिंगपर्यंत पोलीस बंदोबस्त व तारीख मिळताच सुरूच राहणार असल्याची माहिती शहागड एसबीआयचे शाखा व्यवस्थापक प्रशांत धेंडे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली. थकीत खातेदारांना बँकेकडून वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या असून, अजूनही वेळ गेलेली नाही. खातेदारांनी पुढे येऊन बँकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.