

Jalna Crime News: Gang of bike thieves arrested
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरातील अतिरिक्त औद्योगिक वसाहत भागात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर चंदनझिरा पोलिसांनी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करीत चार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जालना शहरातील अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, गजाननसिंह कंपाउंड परिसरातून ९ जानेवारी २०२६ रोजी एक दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच चोरीस गेलेली दुचाकी एमआयडीसी भागात इसम चालवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आकाश दत्तात्रय साळवे (रा. शासकीय महिला वसतिगृहाजवळ, जालना) याला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आकाश साळवे याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
त्याच्या सांगण्यावरून त्याचे साथीदार बाळासाहेब संजय वाघ (रा. बदनापूर), अनिल किशोर मोरे (रा. बोळवाडी, घनसावंगी) आणि रितेश राजू शिंदे (रा. बदनापूर) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पोलिसांनी हिरो होंडा स्प्लेंडर, बजाज सिटी १०० आणि हिरो स्प्लेंडर प्लस अशा चार दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे एमआयडीसी भागासह शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा बसणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालासाहेब पवार यांनी केली.
घटना सुरूच
जालना शहरात दुचाकी चोरी करणारे विविध चोरटे कार्यरत असल्याने गेल्या काही दिवसात दुचाकी चोरीच्या घटनांमधे वाढ झाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही दुचाकी चोरीच्या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे