

Jalna News : MLA Khotkar Takes Aggressive Stance on Erratic Power Supply
जालना, पुढारी वृत्तसेवा : पावसाच्या थोड्या सरी आल्या किंवा वारा आला तर लगेच वीज पुरवठा गायब होण्याचे प्रकार वाढल्याने जालनेकर नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. यापुढे वीज गायब होणार नसल्याचा अधिकाऱ्यांनी शब्द दिला.
मागील काही दिवसांपासून जालना शहर आणि ग्रामीण भागात वीज गायब होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. थोडा बारा आला, आभाळ आले किंवा गडगडाट झाला तरी वीज बंद केली जात होती. तीव्र उन्हामुळे जालनेकर नागरिकांची उकाड्यामुळे तगमग वाढली होती. वीज गायब होताच घरात उकाडा होत असल्याने लहान बाळांना घेऊन महिला रस्त्यावर येत होत्या. वयोवृद्ध व्यक्तींची दमछाक होत होती.
दोन दोन तीन तीन तास वीज गायब असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार अर्जुनराव खोतकर यांनी तातडीने अधीक्षक अभियंता सरग यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कन्हैयानगर येथील कार्यालयात बैठक बोलावली. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, लाईट गेल्यावर लोक तुम्हाला जसे बोलतात तसेच मलाही लोकांचे फोन येतात. तुम्ही लोकांना फुकट वीज देत नाहीत. लोकांना पैसे मोजावे लागतात.
लोकांच्या रोशाला तुम्हाला जसे सामोरे जावे लागते त्यापेक्षा जास्त मला सामोरे जावे लागते. त्यामुळे यापुढे वीज गायब होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या अडचणी असतील तर मला सांगा. मी त्या दर करतो. परंतु लोकांना त्रास व्हायला नको. महानगरपालिका झाडे तोडू देत नाहीत त्यामुळे झाडाच्या फांद्याला अडकून फ्यूज उडतात असे सांगण्यात आले.
याबाबत लगेच महानगरपालिकेला सांगून झाड तोडण्यापेक्षा फांद्या तोडून विजेच्या तारांचा अडथळा दूर करण्यासाठी सहकार्य करा असे सुचविले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सरग यांनीही वीज गायब होत असल्याची कबुली देऊन यापुढे असे प्रकार होणार नाहीत असा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने शब्द दिला. आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, मागील वर्षी सुद्धा आपण बैठक घेतली होती आणि तेव्हाही आपण माझा शब्द पाळला आणि वीज गायब होऊ दिली नाही.
यावर्षीही पावसाळ्यात वीज गायब होणार नाही याची काळजी घ्यावी. अधीक्षक अभियंता श्री. सरग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिलेल्या सूचना सहज घेऊ नका. त्यांचे आपल्याला खूप सहकार्य मिळते.
त्यामुळे यापुढे कोणत्याही भागात वीज गायब झाली तर तातडीने दुरुस्ती करून वीज जोडणी करावी तसेच वीज गायब होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मी कारवाई करेल असे स्पष्ट शब्दात आपल्या कर्मचाऱ्यांना सुनावले. यावेळी उपस्थित अभियंता आणि सर्व लाईनमन यांनी गंभीर दखल घेत जालनेकरांना विजेचा त्रास होऊ देणार नाही असा शब्द दिला आहे.
आ. अर्जुनराव खोतकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जालना शहरातील नागरिकांची विजेच्या त्रासातून सुटका होणार आहे. बैठकीस अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, किशोर पांगरकर, निखिल पगारे, दुर्गेश काठोटीवाले, कमलेश खरे, दीपक राठोड यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता पेन्सलवार, शहर अभियंता गुलाने, शाखा अभियंता गव्हाणे उकांडे ग्रामीण उपाभियंता खिल्लारे व सर्व लाईनमन उपस्थित होते.