

Jalna News: Loan waiver brings relief to about two lakh farmers
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे जालना जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यातील एकूण कृषीकर्जाची आकडेवारी चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील ४ लाख २१ हजार ५३१ शेतकऱ्यांकडे तब्बल ५ हजार ५२४ कोटी रुपयांचे कृषीकर्ज थकीत असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली. या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जावर दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील ३ लाख ५५ हजार ९६ शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी २ लाख ४६ हजार ३५३ शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे. या कर्जदारांपैकी सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा कमी असल्याने अंदाजे १ लाख ९७ हजार ८२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात.
दरम्यान, कर्जमाफीच्या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाच्या तुलनेत हा निर्णय अपुरा असल्याची टीका विरोधी पक्ष करीत आहे.
जिल्ह्यातील कर्जाची स्थिती
एकूण शेतकरी : ४,२१,५३१
एकूण थकीत कृषी कर्ज: ५,५२४ कोटी रुपये
पीक कर्ज वाटप झालेले शेतकरी : ३,५५,०९६ थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी: २,४६, ३५३
कर्जमाफीसाठी संभाव्य पात्र शेतकरी १,९७,०८२