

Jalna News: It is essential to connect farmers to the market
जालना, पुढारी वृत्तसेवा: कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन निक्रा झोनल मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. एन. पी. सिंग यांनी केले आहे.
खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत कार्यरत असलेल्या निक्रा प्रकल्पाच्या सनियंत्रणाचा भाग म्हणून ते बोलत होते. या समितीत सदस्य म्हणून कृषी शास्त्रज्ञ डॉ. आर. बी. सिंगनधुपे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे आणि आयसीएआर-अटारी पुणे चे शास्त्रज्ञ डॉ. तुषार अथारे यांचा समावेश होता.
या समितीने बुधवारी (दि.७) निक्रा प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट गावे पोकळवडगाव आणि पुणेगाव येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांनी शेळीपालन, कुक्कुटपालन, चारा लागवड, बांधबंदिस्ती, बोअर पुनर्भरण, निचरा व्यवस्थापन, बीबीएफ, पहाट्या बारीक करण्यासाठी श्रेडरचा वापर, नैसर्गिक शेती, सीड बँक, अवजारे बँक, हवामान अनुकूल हरभरा आणि ज्वारी प्रात्यक्षिकांना भेटी दिल्या. दुसऱ्या दिवशी (दि.८) सकाळी कृषी विज्ञान केंद्रातील विविध प्रात्यक्षिक युनिटला भेटी दिल्या.
समारोपप्रसंगी शास्त्रज्ञांशी चर्चा करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. कृषी विज्ञान केंद्राने नाबार्डच्या सहाय्याने शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करून त्यामार्फत निक्रा गावातील शेतकऱ्यांना ब्रॅण्डिंग करून शेतमालाची विक्री करण्यास प्रोत्साहित करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शेतकरी यांनी प्रश्न उपस्थितीत केले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव विजयआण्णा बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. समितीने कृषी विज्ञान केंद्राच्या कामावर समाधान व्यक्त केले. समिती भेटीच्या दोन्ही दिवस कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे, शास्त्रज्ञ अजय मिटकरी, राहुल चौधरी. डॉ. संगीता कहऱ्हाळे, शशिकांत पाटील, सुनील कळम, विशाल तौर, सलमान पठाण यांनी सोबत राहून समितीच्या भेटीचे नियोजन केले.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर लक्ष
विजयआण्णा बोराडे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्र हवामान बदलावर पर्याय म्हणून रेशीम शेती, शेळी व कुक्कुटपालन, एकात्मिक शेती पद्धती, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित करीत असून समितीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्राधान्य देईल असेही ते म्हणाले.