

Science exhibitions stimulate children's scientific thinking
जालना, पुढारी वृत्तसेवा: विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारे असे उपक्रम त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संगीता भागवत यांनी केले.
जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेले जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले.
शहरातील ऋषी विद्या स्कूल येथे आयोजित या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी अनिल पवार, गिरीश पुजारी, संजय कायंदे पंचायत समिती जालना येथील गटशिक्षणाधिकारी मनोज कोल्हे प्राचार्य डॉ. हेमा सोनटक्के, डॉ. रवींद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
भागवत पुढे म्हणाल्या की, पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष प्रयोगातून अनुभवण्याची संधी विज्ञान प्रदर्शनातून मिळते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, प्रश्न विचारण्याची वृत्ती व आत्मविश्वास वाढीस लागतो. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण ३९ शाळांनी सहभाग नोंदवला होता.
उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक मत्सोदरी विद्यालय (अंबड) येथील आदर्श सुभाष मगरे, द्वितीय क्रमांक जि. प. प्राथमिक शाळा, एकेफळ (भोकरदन) येथील शुभांगी शिवाजी लहाने व तृतीय क्रमांक लिटल स्टार इंग्रजी शाळा, वडाळा (ता. जाफराबाद) येथील निखिल ज्ञानेश्वर शेजूळ यांनी पटकावला. माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक श्री सरस्वती भुवन प्रशाला (घनसावंगी) येथील गौरव गणेश राठोड, द्वितीय क्रमांक आदर्श स्कूल, अंबड येथील स्वराज गाडे तर तृतीय क्रमांक विवेकानंद माध्यमिक विद्यालय, परतूर येथील अभितोष मुकुंदराव जोशी यांनी केले मिळविला.
या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम देशमुख, अरुण देशमुख, भागवत जेटेवाड, अशोक गायकवाड, साधन व्यक्ती करुणा हिवाळे, शीतल मिसाळ, प्रफुल्ल राजे, सी. बी. जाधव यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख सुनील ढाकरके यांनी केले.
विद्यार्थ्यांची सर्जनशीलता
या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, ऊर्जा, कृषी नवकल्पना, जलसंधारण व डिजिटल तंत्रज्ञान या विषयांवर आधारित आकर्षक व उपयुक्त प्रतिकृती (मॉडेल्स) सादर केली. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांमधून सामाजिक समस्यांवर वैज्ञानिक उपाय सुचवत आपली सर्जनशीलता सादर केली.