

Rajur-Bhokardan National Highway safty wall repair shivsena protest
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : राजूर-भोकरदन राष्ट्रीय महामार्गावरील केदारखेडा गावाजवळ पूर्णागिरजा नदीवर असलेल्या पुलावरील दोन्ही बाजूंचे संरक्षक कठडे दीर्घकाळापासून जीर्ण अवस्थेत होते. अलीकडे हे कठडे पूर्णतः कोसळल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे भोकरदन उप तालुका प्रमुख अर्जुन पाटील ठोंबरे यांनी दिलेल्या निवेदनानंतर आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर तत्काळ संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत पुलावरील सर्व संरक्षक कठड्यांची संपूर्ण पुनर्बाधणी सुरू केली आहे.
या पुलावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने, शेतकरी, विद्यार्थी तसेच प्रवासी वाहतूक करतात. मात्र संरक्षक कठडे नसल्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना थेट नदीपात्रात कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता.
विशेषतः रात्रीच्या वेळी व पावसाळ्यात अपघाताची शक्यता अधिक वाढली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत होता. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोकरदन तालुका उप प्रमुख अर्जुन पाटील ठोंबरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून तत्काळ दुरुस्तीची जोरदार मागणी केली होती.
ठराविक कालावधीत पुलावरील मोडकळीस आलेल्या संरक्षक कठड्याच्या पुनर्बाधणीचे काम सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा ठाम इशाराही उद्धवसे-नेचे भोकरदन उप तालुका प्रमुख अर्जुन पाटील ठोंबरे यांनी दिला होता.
सा. बां. विभागाचे काम सुरू
सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल करत पुलावरील जुने व धोकादायक कठडे काढून टाकून नव्याने मजबूत संरक्षण कठडे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पुलावर लोखंडी शटरिंग उभारणे, सिमेंट काँक्रिटचा पाया तयार करणे तसेच दोन्ही बाजूंना नवीन संरक्षक कठडे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.