

सादिक शेख
आन्वा : भोकरदन तालुक्यातील १२४ पैकी ९२ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, लोकनियुक्त सरपंच व उपसरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर या ग्रामपंचायतींच्या कारभाराची जबाबदारी प्रशासकांकडे सोपविण्यात आली आहे. मात्र, प्रशासकांना आर्थिक अधिकार अत्यंत मर्यादित असल्याने ग्रामीण विकासाची गती मंदावली असून, विकासकामांच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.
गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच आणि उपसरपंच नसल्यामुळे सर्वसाधारण कामांसह स्थानिक पातळीवरील निर्णयांसाठी ग्रामस्थांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत. प्रशासकांचे ‘पद मोठे, पण अधिकार छोटे’ अशी स्थिती निर्माण झाल्याने ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळणे कठीण होत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारालाही खिळ बसल्याचे चित्र आहे.
लोकनियुक्त कारभारी नसल्यामुळे गावातील समस्यांच्या निराकरणासाठी हक्काची व्यक्ती उपलब्ध नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुका लवकर न झाल्यास ग्रामीण भागातील असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य शासनाकडून ५ मार्च रोजी प्रशासकांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापैकी पाच महिने उलटले असून, निवडणुका कधी होणार आणि ग्रामविकासाला गती कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावांतील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
भोकरदन तालुक्यातील १२४ पैकी ९२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून, या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी कार्यकाळ संपलेल्या सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना पाणीपुरवठा, वीज बिल भरणे आणि अत्यंत तातडीची स्वच्छता राखणे यांसारख्या कामांवरच खर्च करण्याची मुभा आहे.
ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नाल्या चोक होणे, रस्त्यांवर चिखल साचणे, डासांचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन स्वच्छतेव्यतिरिक्त अन्य उपाययोजनांसाठी निधी वापरण्याची परवानगी नसल्याने पावसाळ्यात गावांची स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
तालुक्यातील शेकडो गावांमध्ये रस्ते, नाल्या, सौर दिवे आणि समाजमंदिरांच्या दुरुस्तीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. नव्या निविदा आणि निधी वितरणावर निर्बंध असल्याने ही कामे रखडली आहेत. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नवीन योजनांना मंजुरी मिळत नसून, विकासकामे ठप्प झाली आहेत.