Jalna News: Damini squad visits the school
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : शहरात काही दिवसांपूर्वी शालेय मुलीची छेड काढण्याचे प्रकरण घडल्यानंतर शहरात दामिनी पथकाची स्थापना करून मुलींना संरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या अनिता जाधव यांनी केली होती. यासंदर्भात दैनिक पुढारीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत दामिनी पथकाने शहरातील न्यू हायस्कूला भेट दिली. टवाळखोरांनवर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
पथकाने तक्रारदार अनिता जाधव यांना सोबत घेत शहरातील न्यू हायस्कूल गाठत तेथे विद्यार्थिनींची बैठक घेऊन त्यांचे समोपदेशन करताना टवाळखोर मुलांवर कठोर कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनिता जाधव यांच्या सह दामिनी पथकातील शेंदूरकर, ज्योती राठोड, शारदा गायकवाड यांनी उपस्थित मुलींना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. नन्नावरे, माळी, सुदाम गाडेकर लहाने, सयाम, लोणे मॅडम, चौधरी मॅडम आदी उपस्थित होते.
दरम्यान, याबाबत अनिता जाधव यांनी दामिनी पथकासह भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भेट घेऊन भोकरदन शहरातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते जाधव यांना निवेदन देण्यात आले. शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मोठया प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी विविध शाळा व महाविद्यालयात दररोज येत असतात. शाळा व महाविद्यालय सुरु होण्याच्या व सुट्टीच्या वेळी विद्यार्थिनींचा पाठलाग करून छेड काढण्याच्या घटना शहरात घडत असून अशा घटनामुळे मुलींच्या शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे.
तर काही मुली अशा घटनामुळे व्यथित होऊन शिक्षण सोडण्याच्या मानसिकतेत असून पालकांतूनही याबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ दामिनी पथकाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करण्याचे काम करावे व भोकरदन बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी अशी मागणीही शेवटी निवेदनात केली आहे.

